मोठी बातमी : कर्जत जामखेड मतदारसंघातील १०५ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, या तारखेला जाहीर होणार अंतिम प्रभाग रचना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७१ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जाहीर प्रभाग रचनेवर १३ तारखेपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार असून मे महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. यामुळे गावगाड्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. गावपुढार्यांनी निवडणुकीची तयारी हाती घेतली आहे.

१७ फेब्रुवारीला ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार, ३० मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. आता अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या ७७१ ग्रामपंचायतींची प्रारूप रचना मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील १०५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघासह जिल्ह्यातील ७७१ ग्रामपंचायतींच्या डिसेंबर २०२६ पर्यंत निवडणुका होणार आहेत. प्रशासनाकडून प्रारूप रचना जाहीर करण्यात आलेली आहे. १३ एप्रिलपर्यंत नागरिकांना यावर हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना २३ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल.
प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेल्या ग्रामपंचायती (तालुकानिहाय संख्या): अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, नगर ५९, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, नेवासा ५९, पाथर्डी ७९, शेवगाव ४९, कर्जत ५६, जामखेड ४९, पारनेर ८८, श्रीगोंदा ६२,
तसेच २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या ९० जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील निवडणूक जाहीर केला असून गावगाड्यात निवडणुकीचा धुराळा उडू लागला आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढलेला असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
२०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजीनामा, निधन, अनहर्त यासह इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या ६४ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यात ८५ ग्रामपंचायत सदस्य व ५ सरपंच निवडीसाठी निवडणूक पार पडत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे
- प्रशासनाकडून ३० मार्चला निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आली असून १३ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
- १५ एप्रिलला उमेदवारी अर्जाची पडताळणी होईल.
- १७ एप्रिलला अर्ज मागे घेणे तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- २८ एप्रिलला पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
- २९ एप्रिलला निकाल घोषित करण्यात येणार आहे.