मोठी बातमी : डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतील २५ वी बदली; अश्विनी भिडे मुंबईच्या आयुक्त म्हणून नियुक्त, 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer Maharashtra Today List : महाराष्ट्र सरकारने तीनच दिवसांपुर्वी आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आज मंगळवारी राज्य सरकारने १० वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या बदलीचा समावेश आहे. मुंढे यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील आजची २५ वी बदली ठरली आहे. मुंडे यांच्यासह अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.

Big news, Dashing IAS officer Tukaram Mundhe's 25th transfer in 21 years; Ashwini Bhide appointed as Mumbai Commissioner, 10 IAS officers transferred, latest news,

​दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांनी ‘बोगस दिव्यांग’ शोधण्याची धडक मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम वेगात असतानाच अचानक त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले आहेत. सात महिन्यापुर्वीच त्यांची बदली दिव्यांग विभागात झाली होती. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, महसुल व वन विभाग (Disaster Management, R&R) येथे सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माणिक गुरसाल यांची दिव्यांग कल्याण विभागात नियुक्ती झाली आहे.

​अश्विनी भिडे मुंबईच्या नव्या महापालिका आयुक्त

​बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्या कार्यरत होत्या. अश्विनी भिडे आता मुंबई महापालिकेचा कारभार पाहतील. त्यांच्या जागी लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून वर्णी लागली आहे.

१० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कोठे नियुक्ती पहा

  1. ​लोकेश चंद्र – अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई
  2. अश्विनी भिडे – आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
  3. तुकाराम मुंढे – सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  4. विकास चंद्र रस्तोगी – अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग
  5. विनिता वैद सिंघल – प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग
  6. परिमल सिंग – सचिव (कृषी), कृषी आणि एडीएफ विभाग
  7. पृथ्वीराज बी. पी. – आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका
  8. प्रेरणा देशभ्रतार – आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई
  9. लहू माळी – व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प
  10. माणिक गुरसाल – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग

​या बदल्यांमुळे मंत्रालयातील अनेक महत्त्वाच्या विभागांची समीकरणे बदलली आहेत. विशेषतः विकास चंद्र रस्तोगी यांच्याकडे वित्त विभागातील वित्तीय सुधारणांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महानगरपालिकेतून पदोन्नतीने वसई-विरार महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

​मुंढे यांच्या बदलीमुळे दिव्यांग कल्याण विभागातील सुरू असलेल्या चौकशीचे भवितव्य काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंडे यांच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण विभागाचा कारभार आल्याने या विभागाला गतिमान आणि नवा चेहरा देण्याचे काम त्यांना करावे लागेल. या विभागाला भ्रष्टाचाराची लागलेली किडीचे समूळ उच्चाटन करण्यात ते यशस्वी ठरणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.