मोठी बातमी : भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात, थेट दिल्लीतून उमेदवारीची घोषणा, राहुरी विधानसभा पोटनिवडणुक २०२६

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने युवा नेते पै अक्षय कर्डिले यांना मैदानात उतरवले आहे. थेट दिल्लीतून त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत पोटनिवडणुक होत आहे. भाजपने या निवडणुकीत दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पूत्र अक्षय यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मैदानात असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Akshay Kardile Vs Prajakt Tanpure)

Big news, BJP announces Akshay Kardile's candidature, Rahuri Assembly by-election 2026, ahilyanagar latest news today, Akshay Kardile vs Prajakt Tanpure,

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील हेही या निवडणुकीसाठी इच्छुक होते. या पोट निवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचे ते वारंवार सांगताना दिसले. पण पक्षाने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि कर्डिलेंचा वारसा अक्षय कर्डिले हेच चालवतील यावर शिक्कामोर्तब केले.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भगवे वस्त्र धारण केले होते. तिकिट मिळवण्याकरिता त्यांच्याकडूनही प्रयत्न केली जात होते. शेवटी भाजपाने प्राजक्त तनपुरे आणि सुजय विखे यांना बाजूला सारून थेट अक्षय कर्डिले यांनाच तिकिट दिले. जनभावना लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. सुजय विखे पाटील यांनी तिकिट मिळवण्याकरिता अनेक प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रयत्नांना पक्षाने दाद दिली नसल्याचेच अधोरेखित होत आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजून महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे अपक्ष उमेदवारीची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या समर्थकांनी अपक्ष लढतीसाठीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

तनपुरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास ही लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.पारंपरिक पक्षीय समीकरणांपेक्षा व्यक्तिमत्त्वाधारित आणि स्थानिक पातळीवरील नातेसंबंधांचा या निवडणुकीवर मोठा प्रभाव पडू शकतो. तसेच मतविभाजनाचा परिणाम अंतिम निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, इतर राजकीय पक्षांची भूमिका काय राहणार, ते उमेदवार देणार की कोणाला पाठिंबा देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेषतः महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा निर्णय या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो. एकूणच, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवरील निवडणूक न राहता प्रतिष्ठेची लढत बनत चालली आहे. यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.