जामखेड: हळगाव कृषी महाविद्यालयासाठी मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षणाला मंजुरी, सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला पिण्यासाठी व शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने कृषि महाविद्यालयासाठी करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून पाणी आरक्षण मंजुर केले आहे.

जामखेड तालुक्यातील शेती शिक्षणासाठी महत्त्वाचे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला पाणीपुरवठ्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. महाविद्यालयाच्या स्त्रोत बदलाच्या मागणीनुसार मांगी मध्यम प्रकल्पातून सिंचन व पिण्यासाठी पाणी आरक्षणास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कृषी महाविद्यालयातील शैक्षणिक, प्रात्यक्षिक शेती तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे.
हळगाव कृषि महाविद्यालयासाठी सीना नदीवरील निमगाव गांगर्डे जलाशयातून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव यापूर्वी मंजूर करण्यात आलेला होता. मात्र तो प्रस्ताव रद्द करून, मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे)राधाकृष्ण विखे-पाटील व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे १० डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.त्या निर्णयानुसार कृष्णा खोरे महामंडळाने ९ जानेवारी रोजी पाणी आरक्षण मंजुरीचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार हळगाव कृषि महाविद्यालयास मांगी तलावातून ०.४२७२ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजुर करण्यात आले आहे.कृषी शिक्षणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून, हळगांव कृषी महाविद्यालयाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. या निर्णयामुळे कृषी महाविद्यालयातील प्रयोगशील शेती अधिक प्रभावी होणार, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचे प्रशिक्षण मिळणार, पाण्याअभावी रखडलेली कामे मार्गी लागणार,ग्रामीण भागातील शेतकी संशोधनाला बळ मिळणार आहे. सभापती प्रा राम शिंदे यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथे ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाची दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णय क्र.मफुकृवि- १४१५/प्र.क्र.२२८/७-अे अन्वये स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयाकडे हाळगाव येथील गट क्रमांक १६ मधील एकूण ४० हेक्टर ४८ आर इतकी जमीन आहे. सदरहू कृषी महाविद्यालय हे अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत असून येथील वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी पेक्षा कमी आहे. त्यामुळे महाविद्यालयाला पिण्याचे व सिंचनाच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता होत नव्हती. यामुळे महाविद्यालयात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
कृषि महाविद्यालयास पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. त्या अनुषंगाने नागपूर हिवाळी अधिवेशन (डिसेंबर २०२५) काळात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत हळगावपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून हळगाव कृषी महाविद्यालयाकरिता पिण्यासाठी व प्रक्षेत्र सिंचनास पाणी उचलण्यास तत्वत: मान्यता देत नवा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सदर प्रस्तावास मंजुरी देत हळगाव कृषी महाविद्यालयासाठी मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हळगाव कृषि महाविद्यालयाच्या विकासाला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, हळगांव कृषि महाविद्यालयात राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर कृषि महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारती, वसतीगृह इमारती, निवासी इमारती, सुविधा इमारत व ग्रंथालय इमारत इत्यादी इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतू सभागृह इमारत नसल्याने महाविद्यालयाचे विविध शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांकरीता विविध व्याख्याने, विविध चर्चासत्रे, कार्यशाळा घेण्यात अडचणी येत होत्या. त्या दुर करण्यासाठी प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून सरकारने ५ मे २०२५ रोजी १४ कोटी ३२ लाख ८९ हजार खर्चाच्या सभागृहास मंजुरी दिलेली आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रा राम शिंदे यांच्याच माध्यमांतून हळगाव कृषि महाविद्यालयाचा विकास करण्यात येत आहे.
सन २०१८ साली दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यातील शेती क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हळगाव येथे मी मंजुर करून आणले. या कृषि महाविद्यालयास पिण्यासाठी व शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सरकारने कृषि महाविद्यालयासाठी मांगी तलावातून पाणी आरक्षण मंजुर केले आहे.याशिवाय मागील वर्षी महाविद्यालयासाठी १४ कोटी रूपये खर्चाचे सभागृह मंजुर करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयाच्या विकासाला विशेषता: कृषि संशोधनाला गती मिळणार आहे. याचा मोठा फायदा जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मनापासून आभार !