Maratha reservation : तहान भूक विसरून मराठा आरक्षणासाठी लढणारा ढाण्यावाघ मनोज जरांगे ! कोण आहेत Manoj Jarange? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या अंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला करण्याच्या घटनेने महाराष्ट्र नव्हे तर देशाचे लक्ष वेधले आहे. मराठा आरक्षणाचे केंद्र बिंदू अंतरवली सराटी गाव व मनोज जरांगे हे ठरले आहे. या गावात गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी हाती घेतलेल्या उपोषणाच्या अंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी अंदोलन सुरु आहे. पोलिसांनी अंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून राज्यभरात अंदोलन केले जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्याला अजूनही यश आलेलं नाही. या सर्व आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे यांनी सरकारला चांगलाच घाम फोडला आहे. मनोज जरांगे कोण आहेत ? त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
मराठा आंदोलनासाठी जमीन विकली
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज जरांगे मूळचे बीडमधील मातोरी गावचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.
मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता
पांढरा पायजमा आणि 3 गुंड्यांचा शर्ट, गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी अशाच लूकमध्ये मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे अगदी मंत्रालयापासून ते आंदोलनापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. मागील एका दशकाहून अधिक काळापासून मनोज जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत. जरांगे यांनी या कालावधीमध्ये अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले, तरुणांना संघटित करुन आपली मागणी लावून धरली. मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना संपूर्ण मराठवाड्यात ओळखलं जातं. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई-वडील असा मनोज यांचा परिवार असून त्यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.
काँग्रेसपासून फारकत अन् शिवबा संघटनेची स्थापना
मनोज यांनी सुरूवातीला काही काळ काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि कधीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वत:ची शिवबा संघटना स्थापन केली. त्यांनी फार आक्रमक पद्धतीने मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगेच्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच आरोप झाले.
मोर्चे, आंदोलने, चळवळ म्हणजे मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी मनोज यांनी आतापर्यंत 30 ते 40 आंदोलने केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहागडपासून मंत्रालयावर 60 किमीपर्यंत मोठा मोर्चाही त्यांनी नेला होता. या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं आणि त्याची राज्यभर चर्चा झालेली. त्यांनी अनेक मराठा आंदोलनांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण का गरजेचं आहे याबद्दल माहिती देऊन मराठ्यांना एकत्र केले. अनेकदा त्यांनी आपली निवेदने आणि मागण्यांसाठी मंत्रालयाचे उंबरठेही झिजवले आहेत. ते अनेकदा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावरही गेले. मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या सांगण्यानुसार, या माणसाचं आजपर्यंतच निम्मं आयुष्य हे मोर्चे, आंदोलने, चळवळ आणि सरकारी इमारतीच्या पायऱ्या झिजवण्यात गेलं.
मनोज जरांगे यांची मागणी काय ?
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची मागणी केली आहे. मराठवाडा निजामाच्या अखत्यारित असताना मराठा समाजाचा समावेश मागासवर्गात होता. मात्र, संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा सहभागी झाल्यानंतर मराठा समाज खुल्या प्रवर्गात आला. संयुक्त महाराष्ट्रासोबत येताना विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेला लागू असलेल्या सवलती व संरक्षण कायम ठेवले जाईल असा शब्द तेव्हाच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी दिलेला होता. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील मराठा समाजाला ज्या सवलती होत्या त्या लागु कराव्यात, कुणबी प्रमाणपत्र द्यावे, याच मागणीसाठी मनोज जरांगे हे अंदोलन करत आहेत.
मनोज जरांगे उपोषणावर ठाम
मराठा आरक्षणासाठी अंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या अंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. ‘सरकारच्या प्रतिनिधींनी यावं. पण येताना त्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. विनाकारण फक्त बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचं गुऱ्हाळ हे आत्ता आरक्षणासाठी लढणाऱ्या पिढीला अपेक्षित नाही. चर्चेतून प्रश्न सुटतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पहिलेच पाढे पंचावन्न चालू ठेवावेत. सरकारनं काही सकारात्मक निर्णय घेतले असतील, तर त्यांचे लोक येऊन सांगतील’, असंही त्यांनी नमूद केलं.
‘सरकारचं येणारं शिष्टमंडळ मराठ्यांच्या विजयाचा कागद घेऊन येईल याविषयी मला शंका नाही. त्यांनी हा निर्णय घेतलाच असेल. पण अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा’, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सोमवारी इशारा दिला.