अहिल्यादेवींचे जन्मस्थान ‘इको-टूरिझम’चे केंद्र बनणार; ५० ते ७० हजार भाविकांच्या सोयीसाठी राम शिंदेंचे प्रशासनाला मोठे निर्देश!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांनी अठराव्या शतकात दिलेल्या जलसंवर्धन आणि वृक्ष संवर्धनाच्या संदेशाची प्रचिती आता त्यांच्या जन्मस्थळी (birthplace)अर्थात श्री क्षेत्र चोंडी (chondi) येथे येणाऱ्या देशभरातील पर्यटकांना अनुभवता येणार आहे. चोंडी विकास आराखडा (Chondi Development Plan) केवळ सिमेंटच्या बांधकामापुरता मर्यादित न ठेवता तो पूर्णपणे पर्यावरणस्नेही पर्यटन (इको-टूरिझम) Eco-tourism संकल्पनेवर आधारित असावा, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत ५ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत चोंडी विकास आराखड्याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. या वेळी प्रा. शिंदे यांनी नियोजित आराखड्यात आवश्यक सुधारणा व विस्तार करण्याच्या सूचना केल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येत असतात. त्यामुळे यात्रेच्या काळात एकावेळी किमान ५० ते ७० हजार भाविकांची सोय होईल, अशा पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

चोंडी येथील जन्मस्थळ परिसराचे सुशोभीकरण दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखत इको-टूरिझमच्या दृष्टीने आराखड्यात आवश्यक ते बदल करण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धनाच्या संदेशाची जपणूक या विकास आराखड्यातून दिसून यावी, असेही नमूद केले. भाविक आणि पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर व चौंडीश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ या सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्थानिक उत्पादने व पारंपरिक खाद्यपदार्थांची बाजारपेठ उभारण्याचा प्रस्तावही आराखड्यात समाविष्ट करावा, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित विकास आराखड्याची माहिती सादर केली. त्यावर प्रा. शिंदे यांनी विविध सूचना देत आराखडा अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्याचे निर्देश दिले.