स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर गडचिरोलीच्या आदिवासी गावांमध्ये प्रथमच धावणार एसटी बस, आंबेझरीसह 15 गावांसाठी बससेवा सुरू !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आंबेझरीसह 15 आदिवासी गावांना अखेर राज्य परिवहन महामंडळाची लालपरी धावू लागली आहे. नक्षलवादाच्या सावटाखाली अनेक दशके दडपून राहिलेल्या या भागात पोलीस व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आणि 18 ऑगस्ट 2025 रोजी या गावांमध्ये बस सेवा सुरू झाली.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीतील अतिदुर्गम मौजे आंबेझरीसह एकूण 15 गावांसाठी बससेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ‘नक्षलमुक्त भारत’ संकल्पना वेगाने साकार होत आहे. हा केवळ दळणवळणाचा नाही, तर विश्वासाचा आणि विकासाचा मार्ग आहे. या विशेष प्रयत्नांसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

बस येताच आंबेझरी व परिसरातील गावकरी यांनी नृत्य-संगीत, ढोल-ताशांच्या गजरात ध्वजारोहण करून बसचे स्वागत केले. पोलिस व नागरिकांनी चालक-वाहकांचा सत्कार केला. गावात बस दाखल होताच अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात पाणी होतं तर चिमुकले आणि तरुणांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता.

गेल्या वर्षी जुलैमध्ये C-60 कमांडोंनी मोठी मोहीम राबवून चार नक्षल गटांना निष्प्रभ केले. त्यानंतर जिल्हा पोलिसांनी रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्रे व दळणवळण सुविधा सुरू करण्यासाठी प्रशासनासोबत काम केले. काटेडारी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या उपस्थितीत या सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक पायरी शक्य झाली.
मार्ग व कनेक्टिव्हिटी
नवीन बससेवा गडचिरोली–चटगाव–धानोरा–येरकड–मुरूमगाव–खेडेगाव–आंबेझरी–मांगेवाडा–जयसिंगटोला–मालेवाडा अशा मार्गावर धावणार असून एकूण 15 गावांना या बससेवेचा थेट फायदा होणार आहे. याआधी याच जिल्ह्यात काटेजरी–गडचिरोली (एप्रिल 2025), मार्कानार (जुलै 2025) व गट्टा–गार्डेवाडा–वांगेटुरी (जानेवारी 2025) अशा मार्गांवर बससेवा सुरू झाली होती.

गेल्या काही वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात 420 किमीहून अधिक रस्ते, 60 पूल आणि 500 हून अधिक मोबाइल टॉवर्स उभारले गेले आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील लोकांना बाजारपेठा, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था गाठणे सोपे झाले आहे.
स्थानिकांसाठी नवे आयुष्य
- या बससेवेने विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी व दैनंदिन कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात सहज जाता येईल,
- रुग्णांना वेळेत जिल्हा रुग्णालयात पोहोचता येईल,
- तर शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ गाठणे शक्य होईल.

गेल्या 78 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या भागात अखेर लालपरी पोहोचली आहे. एकेकाळी “रेड कॉरिडॉर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात आता विकासाचा लाल झेंडा फडकत आहे. स्थानिकांसाठी ही केवळ बससेवा नसून नव्या आयुष्याची व नव्या भविष्याची वाट आहे.