Sagar Mohalkar News : 5 गोळ्या, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् अचानक आलेला ‘शॉक’; सागर मोहळकरच्या मृत्यूचा धक्कादायक घटनाक्रम आला समोर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sagar Mohalkar News : नामांकित मल्ल ते कुख्यात गुंड असा प्रवास करणाऱ्या पैलवान सागर मोहळकर (वय ३२) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. गेल्या १२ दिवसांपासून त्याच्यावर पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या १२ दिवसांत नेमकं काय घडलं? त्याच्या उपचार आणि मृत्यूबाबत धक्कादायक तपशील समोर आले आहेत. (Sagar Mohalkar death Jamkhed)

४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जामखेडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यात सागर मोहळकरच्या शरीरात ५ गोळ्या घुसल्या होत्या. जामखेड, अहिल्यानगर येथील उपचारानंतर त्याला पुण्याला हलविण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Sagar Mohalkar News)
१२ दिवसांत काय घडलं?
ससूनमधील ईएनटी सर्जन आणि न्यूरोसर्जन यांच्या संयुक्त पथकाने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली होती. डॉक्टरांनी C6 लॅमिनेक्टॉमी’ ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्यात अडकलेली गोळी यशस्वीपणे बाहेर काढली होती.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान सागरला मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवत होती. इतकेच नाही तर त्याला भ्रमावस्था (Delirium) देखील जाणवत होती. यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेण्यात आले होते.
१५ मार्च रोजी साडेचार वाजेपर्यंत त्याची प्रकृती स्थिर वाटत असताना अचानक त्याला खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी त्याला ‘न्यूमोनायटिस’ (Pneumonitis) झाल्याचा संशय व्यक्त केला. प्रकृती वेगाने खालावल्यामुळे त्याला तातडीने सर्जिकल आयसीयूमध्ये हलवून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. (Sagar Mohalkar News)
व्हेंटिलेटरवर असताना सागरची प्रकृती अधिकच बिकट झाली. त्याला तीव्र श्वसन विकार (ARDS – Acute Respiratory Distress Syndrome) आणि ‘शॉक’ची लक्षणे दिसू लागली. ससूनमधील फुफ्फुसरोग तज्ज्ञांसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीराचा प्रतिसाद कमी होत गेल्याने १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ससून रुग्णालयाने दिलेल्या या सविस्तर अहवालामुळे सागरच्या शेवटच्या १२ दिवसांतील वैद्यकीय संघर्षाचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Sagar Mohalkar News)
Sagar Mohalkar News : नेमकं प्रकरण काय ?
४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड सागर मोहळकरवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्याच्यावर ७ राऊंड फायर करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याच्या शरीरात पाच गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गंभीर जखमी झाला होता. या घटनेने जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. (Sagar Mohalkar News)
या प्रकरणाचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी अभिमन्यू महादेव पोते (रा. जामखेड) याला झिक्री परिसरातून अटक केली होती. त्याच्या चौकशीत खालील धक्कादायक माहिती समोर आली होती. (Sagar Mohalkar News)
- जुन्या वादाचा वचपा: जुन्या वादातूनच सागरचा काटा काढण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.
- सागर मोहळकरच्या हालचालींवर अभिमन्यू पोते हा लक्ष ठेवून होता, त्याने मारेकर्यांना माहिती पुरवत हा हल्ला घडवून आणला होता.
- पुणे कनेक्शन: हा हल्ला करण्यासाठी पुण्याच्या कोथरूड भागातील गुंडांची मदत घेण्यात आली होती.
- आरोपींची धरपकड: पोलिसांनी आतापर्यंत अभिमन्यू पोते आणि पुण्यातील रोहित विठ्ठल आखाडे याला अटक केली आहे.
- फरार आरोपी: चार्ली ऊर्फ माऊली साठे आणि चिन्या या पुण्याच्या सराईत गुंडांचा शोध अद्याप सुरू आहे.
सागर मोहळकर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी याआधी ‘खुनाचा प्रयत्न’ आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. मात्र, आता सागरचा मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात ‘खुनाचे कलम’ वाढणार आहे. सागरची हत्या जुन्या वादातून झाली की आणखीन काही वेगळे कारण आहे ? याचाही पोलिसांकडून वेगाने शोधू सुरू आहे.