Jamkhed News : सासरच्या छळास कंटाळून सुनेने उचलले टोकाचे पाऊल, नायगाव हुंडाबळी प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हे दाखल, फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जामखेड (jamkhed) तालुक्यातील नायगाव (Naigaon) येथील २५ वर्षांच्या विवाहितेने आपल्या दोन लेकरांसह जीवनयात्रा संपवण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पती आणि सासरीकडील मंडळींच्या छळ आणि जाचास कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने नायगावच नव्हे, तर संपूर्ण जामखेड तालुक्यात (jamkhed taluka) नायगाव हुंडाबळी प्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनला ४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये मयत विवाहितेचा नवरा, सासरा, नणंद, नंदवा यांचा समावेश आहे. (Jamkhed kharda news today)

Jamkhed News, Tired of being harassed by her in-laws, daughter-in-law takes extreme step with her 2 children, cases registered against four in Naigaon dowry case, what exactly is said in the complaint? Read in detail,

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी रूपाली नाना उगले (वय २५) या विवाहितेने पती आणि सासरीकडील मंडळींच्या छळ आणि जाचास कंटाळून आपल्या दोन लहान लेकरांसह गावातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ही घटना शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. या घटनेत रूपाली हिच्यासोबत तिचा सहा वर्षांचा मुलगा समर्थ आणि चार वर्षांची मुलगी साक्षी या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तब्बल सतरा तासानंतर मृतांचे शवविच्छेदन

विवाहितेने पोटच्या लेकरांसह विहीरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. माहेरकडील मंडळींनी सासरकडील मंडळींविरोधात जोवर गुन्हा दाखल केला जात नाही तोवर मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. तब्बल सतरा तासानंतर खर्डा पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी सह आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

९ रोजी सायंकाळी पाच वाजता

शवविच्छेदनानंतर जो पर्यंत आरोपींना अटक होत नाही तोवर अंत्यसंस्कार केले जाणार नाही असा पवित्रा मयतेच्या नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आज ९ रोजी सायंकाळी पाच वाजता नायगावमध्ये तिघा मयतांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

फिर्यादीत नेमकं काय म्हटलयं ?

मयत रूपालीचे वडिल शिवाजी श्रीरंग सकुंडे (रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत पती नाना प्रकाश उगले, सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले (दोघे रा. नायगाव), नणंद मनिषा शिवाजी टाळके आणि तिचा पती शिवाजी गोरख टाळके (दोघे रा. राळेसांगवी) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आठ वर्षे लग्नाला पण सासरचा जाच काही संपेना

फिर्यादीनुसार, रूपालीचा विवाह सुमारे आठ वर्षांपूर्वी नायगाव येथे झाला. पहिल्या दीड वर्षात संसार चांगला चालला, पण त्यानंतर पती आणि सासरी मंडळींचा त्रास सुरू झाला. माहेरी येऊ न देणे, फोनवर बोलू न देणे, भेटू न देणे, पैशांची मागणी करणे – हे प्रकार सुरू झाले. रूपालीने वडिलांना सांगितल्यानंतर संसार टिकावा म्हणून त्यांनी दोन लाख रुपये दिले. काही काळ संसार सुरळीत झाला, पण सासरच्या मंडळींचा त्रास थांबला नाही.

.. ती मागणी पुर्ण कर नाही तर नवर्‍याचे दुसरे लग्न लावून देऊ – सतत धमकी

मागील दोन वर्षांपासून रूपालीच्या सासरीकडील मंडळींनी घर बांधण्यासाठी आणि विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत होते. ही मागणी पूर्ण न झाल्यास तिच्या पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी तिला देण्यात आली होती. रूपालीला वारंवार अपमानित करून तिच्यावर मानसिक ताण आणला जात होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, १९ जून रोजी होता रूपालीच्या भावाचा विवाह होता. त्यावेळी तो तिला माहेरी नेण्यासाठी नायगावला आला होता. त्यावेळी तिचे पती व सासऱ्यांनी तिला लग्नाला पाठवण्यास नकार दिला. तरीही रूपाली एकटी लग्नाला आली, पण थोड्याच वेळात ती लग्नाहून परत निघून आली होती. सासरच्या मंडळींचा सततचा छळ, धमक्या आणि अपमानाला कंटाळून अखेर तिने ८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सायंकाळी आपल्या दोन्ही लेकरांसह विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली होती.

या कलमानुसार गुन्हा दाखल

या घटनेबाबत खर्डा पोलिसांनी पती, सासरे, नणंद आणि नंदावाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३, १०८, भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३, ३५१ (२)भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३, ३५१ (३), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३, ३ (५) नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल राजपूत व त्यांची टीम करत आहे.