जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले आई-वडिलांचे छत्र, कुमटकर दाम्पत्याचा मोठा निर्णय, न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख: Jamkhed Loknyayalay Success Story: कौटुंबिक वादातून विखुरलेली नाती पुन्हा कशी जोडली जाऊ शकतात, याचा प्रत्यय जामखेडच्या राष्ट्रीय लोकन्यायालयात पाहायला मिळाला. पोटगीच्या प्रलंबित प्रकरणामुळे वर्षभरापासून दुरावलेल्या कुमटकर दाम्पत्याने, न्यायाधीश आणि वकिलांच्या न्यायालयीन मध्यस्थीनंतर सर्व मतभेद विसरून पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत संवेदनशीलतेने घडवून आणलेली ही यशस्वी तडजोड केवळ खटल्याचा निकाल नसून, एका ३ वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आई-वडिलांचे प्रेम पुन्हा मिळवून देणारी एक सकारात्मक यशोगाथा ठरली आहे. (Jamkhed Loknyayalay Success Story)

“न्यायालय म्हणजे केवळ तारखा आणि खटले” हा समज जामखेडमध्ये पार पडलेल्या ‘राष्ट्रीय लोकन्यायालयाने फोल ठरवला आहे. जामखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात केवळ कायदेशीर निकालच लागले नाहीत, तर एका तुटलेल्या संसाराला पुन्हा नवी उभारी आणि नवसंजवनी मिळाली आहे. पोटगीसाठी न्यायालयात आलेल्या कुमटकर दाम्पत्याने सर्व वाद विसरून पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालय परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. (Jamkhed Loknyayalay Success Story)
’श्रद्धा’च्या भविष्यासाठी आई-वडिलांचे मनपरिवर्तन
मंदा सुरेश कुमटकर आणि सुरेश अशोक कुमटकर यांच्यात कौटुंबिक वादातून दुरावा निर्माण झाला होता. हे प्रकरण इतके ताणले गेले की, मंदा यांनी पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. या दोघांना ‘श्रद्धा’ नावाची ३ वर्षांची चिमुकली मुलगी आहे. पती-पत्नीमधील या कायदेशीर लढाईत श्रद्धाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, लोकन्यायालयाच्या व्यासपीठावर या नात्याला पुन्हा एक संधी देण्यात आली. (Jamkhed Loknyayalay Success Story)
न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
हे अवघड प्रकरण हाताळताना न्यायाधीश श्रीमती यू. ए. भोसले मॅडम व न्यायाधीश श्रीमती ए. बी. फंड मॅडम यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका बजावली. त्यांनी केवळ कायदेशीर बाजू न पाहता दोन्ही बाजूंना संसाराचे महत्त्व आणि मुलांच्या भविष्यावर होणारे परिणाम समजावून सांगितले.
याकामी अर्जदाराचे वकील ॲड. जे. एम. कोल्हे आणि सामनेवाले यांचे वकील ॲड. हर्षल डोके (अध्यक्ष वकील संघ जामखेड) यांनी पक्षकारांमधील अविश्वास दूर करून यशस्वी मध्यस्थी केली. वकिलांच्या या सकारात्मक प्रयत्नांमुळेच मंदा यांनी पुन्हा पती सुरेश यांच्यासोबत सुखाचा संसार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे छत्र
या यशस्वी तडजोडीचा सर्वात मोठा फायदा ३ वर्षांच्या श्रद्धाला झाला आहे. आई-वडिलांच्या दुराव्यामुळे जी बाल्य हरवले होते, ते आता पुन्हा सावरले जाणार आहे. लोकन्यायालयाने केवळ कागदोपत्री निकाल दिला नाही, तर श्रद्धाला तिच्या आई-वडिलांचे एकत्रित प्रेम आणि छत्र मिळवून दिले. “लोकन्यायालय हे केवळ प्रकरणांचा निपटारा करण्याचे साधन नसून, ते समाज जोडण्याचे काम करते,” हे या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
…आणि ‘श्रद्धा’चा वनवास संपला!
न्यायालयाच्या पायऱ्या चढताना अनेकदा नात्यांमधील ओलावा आटलेला असतो, मनात कटुता आणि डोळ्यात एकमेकांबद्दल राग असतो. मंदा आणि सुरेश कुमटकर यांच्या बाबतीतही तेच घडले होते.पोटगीच्या दाव्यामुळे संसाराची दोन शकले झाली होती. मात्र, लोकन्यायालयाच्या त्या दालनात कायद्याच्या कलमांपेक्षा रक्ताच्या नात्याची ओढ सरस ठरली ३ वर्षांच्या चिमुकल्या श्रद्धाच्या निरागतेने आई आणि वडिलांचा दुरावा दुर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. (Jamkhed Loknyayalay Success Story)
Jamkhed Loknyayalay Success Story
न्यायाधीश आणि वकिलांनी जेव्हा ‘संसार’ नावाच्या नाजूक पुस्तकातील फाटलेली पाने पुन्हा सांधण्याची भाषा केली, तेव्हा पती-पत्नीच्या डोळ्यांतून पश्चात्तापाच्या धारा वाहू लागल्या. मागील सर्व मतभेद, राग आणि अविश्वास न्यायालयाच्या उंबरठ्यावरच सोडून हे दाम्पत्य जेव्हा पुन्हा एकत्र घराकडे निघाले, तेव्हा केवळ एक खटला संपला नव्हता, तर एका चिमुकलीचा ‘वनवास’ संपला होता.
लोकन्यायालयाच्या या निर्णयाने हे सिद्ध केले की, कायद्याचे हात केवळ शिक्षा देण्यासाठी नसतात, तर विखुरलेली कुटुंबे पुन्हा सावरण्यासाठी आणि निरागस बालकांना त्यांच्या आई-वडिलांचे एकत्रित छत्र मिळवून देण्यासाठीही तितकेच खंबीर असतात. आज कुमटकर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होते, ते कोणत्याही कायदेशीर विजयापेक्षा कितीतरी मोठे होते. (Jamkhed Loknyayalay Success Story)
जामखेड लोकन्यायालयाचा ‘विक्रमी’ आकडा
केवळ कौटुंबिक वादच नाही, तर इतर अनेक क्षेत्रातील प्रकरणांचाही यात यशस्वी निपटारा करण्यात आला.
- प्रलंबित प्रकरणे: ५६
- दाखलपूर्व प्रकरणे (ग्रामपंचायत, नगर परिषद, बँका): ३,१९०
- एकूण निकाल: ३,२४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या प्रक्रियेत ॲड. अमीर पठाण, ॲड. कल्पेश गायकवाड, साद शेख, विधी सेवा समितीचे ढगे, पॅनल सदस्य ॲड. अशोक थोरात, ॲड. अशोक कुंभार आणि न्यायालयीन कर्मचारी येडे व अमिना यांनी विशेष परिश्रम घेतले.