जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान या पावसाने केले आहे. शेतकरी वर्ग यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या धुव्वाधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे सुरु झाली आहे.

जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरु आहे. मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरण्याच्या अनेक घटना तालुक्यात घडल्या आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये या घटना अधिक घडल्या आहेत. घरांची पडझड होण्याच्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे घडली आहे. या घटनेत घर अंगावर कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे गौतम बाबासाहेब गोरे हे पत्नी सोनाली गौतम गोरे (वय ३५) मुलगा सार्थक गौतम गोरे १४ हे तिघ जण घरात झोपलेले असताना पहाटे साडेचारच्या सुमारास झोपेतच त्यांच्या अंगावर घर कोसळले यात तीघे जण जखमी झाले यातील गौतम गोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे.
घर कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला हे ऐकून ताबडतोब आसपासचे लोक जमा झाले यांनी ताबडतोब जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढले व त्यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवले. घटनेची माहिती पोलीस पाटील तुषार चव्हाण पाटील यांनी तहसीलदार, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिली शासकीय यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला आहे.