विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी भाजपने विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी हाती घेतली आहे. आज भाजपने प्रचार नियोजन समितीची बैठक घेत निवडणूकीचे रणशिंग फुंकले. या बैठकीत विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांच्याकडे जामखेड नगरपरिषद निवडणूकीचे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली. या निर्णयामुळे पक्षात उत्साह संचारला आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत सर्वच्या सर्व २५ जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रणनिती आखली आहे. त्यादृष्टीने आज प्रचार नियोजनासाठीची बैठक पार पडली.या बैठकीत निवडणूकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेण्यात आला. नगरपरिषद निवडणूकीसाठी भाजपने रिंगणात उतरवलेल्या सर्व उमेदवारांसाठी कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या टीम बनवत त्यांच्याकडे एका प्रभागाची जबाबदारी भाजपने सोपवली आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सर्व २५ जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. जिथे कुठे अडचण असेल तिथे माझ्यासहीत सर्व श्रेष्ठी लक्ष घालतील. ही निवडणूक गाफिलपणे लढून चालणार नाही, मायक्रो प्लॅनिंग करून मताचे नियोजन करावे, जामखेड शहरातील जनता विकासाच्या पाठीशी ठाम राहणार आहे, प्रत्येक उमेदवाराने भाजपचा विकासाभिमुख चेहरा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. केंद्र आणि राज्यात आपले सरकार आहे, नगरपरिषदेत आपली सत्ता आल्यास शहर विकासाचा चेहरा मोहरा आपणच बदलू शकतो हेच जनतेला सांगा, कुठलाही गाफिलपणा करू नका, असा संदेश देत विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

यावेळी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात, पै प्रविण घुले, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, निवडणूक प्रभारी शेखर खरमरे, जेष्ठ नेते दत्तात्रय वारे, अल्लाउद्दीन काझी, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती नंदकुमार गोरे, उपसभापती आबा पाटील, माजी सभापती भगवान मुरुमकर, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष अनिल गदादे, बापुराव ढवळे, माजी तालुकाध्यक्ष अजय काशीद, बापूसाहेब शेळके सह आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.