जामखेड पोलिसांची मोठी कारवाई : बीडच्या पाटोद्याकडे जाणारा ५२ लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५२ लाख १४ हजार ६४० रुपयांचा गुटखा व तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी आयशर टेम्पोसह चालकाला अटक करण्यात आली असून, जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे हा गुटखा नेला जात असतानाच जामखेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Jamkhed Police take major action, Gutkha and tobacco stock worth over Rs 52 lakhs seized, jamkhed news today,

दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे पथकासमवेत गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहीजळगाव मार्गे जामखेडच्या दिशेने एक केशरी रंगाचा महिंद्रा कंपनीचा मिनी कंटेनर गुटखा घेऊन येत आहे. ही खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पथक रवाना केले.

पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अरणगाव (ता. जामखेड) परिसरात संशयित टेम्पो पोलिसांना येताना दिसला. पोलिसांनी नायरा पेट्रोल पंपाजवळ वाहन अडवले. चौकशीत चालकाने आपले नाव वैभव अशोक घायाळ (वय २६, रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे सांगितले.

तपासादरम्यान टेम्पो क्रमांक MH-12 VY-0823 मधून गुटखा व तंबाखूचा मोठा साठा आढळला. हिरा कंपनीचा गुटखा व तंबाखू : ₹३४,१४,६४०/-, आयशर टेम्पो किंमत : ₹१८,००,०००/- एकूण मुद्देमाल किंमत : ₹५२,१४,६४०/-

संपूर्ण मुद्देमाल जप्त करून चालक वैभव घायाळ याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप पांडुरंग घोळवे  यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार भा. दं. सं. २७२, २७३, २७४, २७५, ३ (५५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे पोलिस दशरथ चौधरी यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात  सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोसई किशोर गावडे, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे, देविदास पळसे, चालक महादेव मिसाळ, होमगार्ड संदीप चव्हाण आदींचा सहभाग होता.