जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली आहे. सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लिंग्या काळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काळे हा गेल्या काही महिन्यांपासून तो फरार होता. नागेश्वर यात्रोत्सवाच्या काळात जामखेड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जामखेड पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाई केल्यामुळे इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणून गेले आहेत.

सविस्तर असे की, जामखेड पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ज्ञानेश्वर काळे हा जामखेड शहरातील मिलिंदनगर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या पथकाने २४ रोजी मिलिंदनगर परिसरात सापळा लावला होता.

संशयित आरोपी ज्ञानेश्वर काळे ( रा. जांब, ता. भूम, जि. धाराशिव) हा जामखेड शहरातील मिलिंदनगर भागातील काटवनात स्वता:चे अस्तित्व लपवत असल्याचे पोलिस पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपी काळे हा काटवनाचा आडोसा घेऊन पसार होण्याच्या बेतात होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी लोखंडी तलवार हस्तगत केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर लिंग्या काळे वय २२ वर्षे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध राज्यातल्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन गुन्हे जामखेड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याशिवाय सोलापुर तालुका पोलिस स्टेशन व कर्जत पोलिस स्टेशन येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून वाशी पोलिस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत. काळे याला जामखेड पोलिसांनी अटक करण्याची कारवाई केल्यामुळे जामखेड पोलिसांचे कौतूक होत आहे.
पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पो.स. ई. किशोर गावडे, पोलिस काँस्टेबल देवा पळसे, कुलदीप घोळवे, ईश्वर माने, प्रकाश मांडगे, राहूल गुंडू, नितीन शिंदे (सायबर सेल) यांचा समावेश होता.
राज्यात प्रसिध्द असणारा जामखेडचा नागेश्वर यात्रोत्सव सध्या सुरु आहे. हा यात्रोत्सव शांततेत पार पडावा याकरिता पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे यात्राकाळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा ॲक्शन प्लॅन हाती घेतला आहे. सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई राबवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणून गेले आहेत.