जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने मध्यरात्री एका मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 40 हजार रूपये किंमतीची चोरीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.ही कारवाई 13 ऑगस्ट रोजी पहाटे 1.20 वाजेच्या सुमारास अरोळेवस्ती, करमाळा रोड येथे करण्यात आली. या कारवाईमुळे जामखेड शहर व तालुक्यातील मोटारसायकली चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जामखेड पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने शहरात एका संशयित मोटारसायकलस्वारास थांबवले. त्याच्याकडे गाडीच्या मालकीबाबात व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर युवकाकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल खर्डा येथून चोरली असल्याचे कबूल केले. यासंदर्भात खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 50/2025, भादंवि कलम 303(2) अंतर्गत नोंद असल्याचे जामखेड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई 13 ऑगस्ट रोजी पहाटे करण्यात आली.

जामखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत गौतम संजय पवार (वय 20, रा. आढळा, ता. कळंब, जि. धाराशिव) या मोटारसायकल चोरास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 40 हजार रूपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांत गुन्हा रजि. नं. 463/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त वाहनाचे तपशील पुढीलप्रमाणे:
- किंमत: ₹40,000
- कंपनी व मॉडेल: हिरो एचएफ डिलक्स (काळा रंग, लाल पट्टा)
- आरटीओ नं.: MH-16-BB-5513
- चेसिस नं.: MBLHAR054J9H24368
- इंजिन नं.: HA11EPJ9H25787
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात सफौ शिवाजी कदम, पोकॉ देविदास पळसे, पोकॉ बाबासाहेब कडभणे, व पोकॉ कुलदिप घोळवे यांचा समावेश होता.
