जामखेड : ट्रकचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अवघ्या १२ तासांत चार आरोपींना अटक, जामखेड पोलिसांची धडक कारवाई
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड साकत रोडवर ट्रकचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जामखेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ३१ मार्च रोजीच्या घटनेचा अवघ्या १२ तासांत छडा लावत ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मोठी कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड-साकत रोडवरील सावरगाव शिवारात ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याची घटना ३१ मार्च मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली होती. जामखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या या वेगवान कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष बिभीषण फरताडे (रा. सोमनाथ वाडी, जि. बीड) हे दि. ३१ मार्च रोजी मध्यरात्री आपल्या ट्रकने (क्र. MH14 LX 9969) पुण्याहून माजलगावकडे कोंबडीचे खाद्य घेऊन जात होते. त्यांच्यासोबत सहचालक बाळू शामराव तांबे हेदेखील होते.
मध्यरात्री सुमारे १२:३० वाजेच्या सुमारास जामखेड-साकत रोडवर सावरगाव शिवारात स्पीड ब्रेकरमुळे ट्रकचा वेग कमी झाला. यावेळी दबा धरून बसलेल्या एका स्कुटीस्वाराने ट्रकसमोर गाडी आडवी लावली. त्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी ट्रकची काच फोडून चालक व सहचालकाला बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून चालकाच्या खिशातील रोख रक्कम आणि गाडीतील साहित्य जबरदस्तीने लुटून पोबारा केला.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक संशयास्पद मोटारसायकल मिळून आली. याच मोटारसायकलचा दुवा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपासाची दिशा निश्चित केली. पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत आरोपींचा शोध लावला.
या कारवाईत पोलिसांनी:
१) शुभम सूर्यभान चव्हाण
२) शुभम ज्ञानोबा चव्हाण
३) राम अशोक अडाले
आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी सावरगाव (ता. जामखेड) येथीलच रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या पथकात पोसई किशोर गावडे, परि पोसई पुष्कर कडू, पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देविदास पळसे, कुलदिप घोळवे, आकाश शेवाळे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, भागीरथ देशमाने, दत्तु बेलेकर, इश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगाबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो. कॉ. नितीन शिंदे आणि राहुल गुंडू यांचा समावेश होता.
दरोड्यासारखा गंभीर गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणल्याबद्दल जामखेड पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.