जामखेड ब्रेकिंग : घुंगरू कलाकेंद्रातील नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड, माजी नगरसेवक संदिप गायकवाडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिपाली पाटील (Deepali Patil) या नृत्यांगणेच्या आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी (०५ डिसेंबर रोजी) एक मोठी घडामोड समोर आली आहे. मयत दिपालीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलिसांनी माजी नगरसेवक संदिप गायकवाड (Sandip Gaikwad) याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Jamkhed news today)

गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहरातील घुंगरू कलाकेंद्रात काम करणारी दिपाली पाटील (Dipali Patil) ही नृत्यांगणा आपल्या मैत्रिणींसमवेत जामखेडच्या तपनेश्वर भागात राहत होती. गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) दुपारी “बाजारात जाऊन येते” असे सांगून ती घराबाहेर पडली होती. दुपारनंतरही ती घरी परत न आल्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही.
वारंवार प्रयत्न करूनही दिपाली सापडत नसल्याने तिच्या मैत्रिणींनी ती ज्या रिक्षाने बाजारात गेली होती त्या रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता त्याने “दिपालीला खर्डा रोडवरील हॉटेल साई लाॅज येथे सोडले” अशी माहिती दिली. त्यानुसार तिच्या मैत्रिणी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साई लॉजमध्ये पोहोचल्या. संबंधित रूम आतून लॉक होती. वेटरने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यावर दिपाली पाटील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांनी सदर घटनेची माहिती मयत दिपालीच्या कुटूंबियांना कळवल्यानंतर तिची आई दुर्गा अरूण गायकवाड यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत शुक्रवारी (५ रोजी) जामखेड गाठले. दिपालीच्या मृत्यूस माजी नगरसेवक संदिप गायकवाड हा जबाबदार असून तो दिपालीला लग्नासाठी सतत त्रास देत असायचा, छळ करायचा अशी माहिती दिपालीच्या आईने पोलिसांना दिली. त्यानुसार संदिप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक संदिप गायकवाड याला अटक केली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.