ब्रेकिंग न्यूज : जामखेडमध्ये अडीच किलो गांजा पकडला, एलसीबी व जामखेड पोलिसांची धडक कारवाई, एकास अटक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड पोलिसांच्या साथीने २.६६ किलो गांजा जप्त करण्याची मोठी कारवाई जामखेड शहरात पार पाडली. या कारवाईत ४१ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परिसरातील नितिन उर्फ कव्या धनसिंग पवार व निशा नितीन पवार यांच्याकडे गांजा विक्रीस असून त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गुप्त बातमी एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने स्थानिक जामखेड पोलिसांना सोबत घेत या भागात छापेमारी केली. यावेळी केलेल्या कारवाईत नितीन पवार याच्या घरातून ४१ हजार ८०० रूपये किंमतीचा २.६६ किलो गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक श्यामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गु. र. नं. ५४७/२०२५ प्रमाणे गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (व) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपी नितिन उर्फ कव्या धनसिंग पवार याला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जामखेडचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक, संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार, रमेश गांगर्डे, हृदय घोडके, बिरप्पा करमल, गणेश लबडे, फुरकान शेख, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर तसेच जामखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार शेख, पोलिस काँस्टेबल दिपक बोराटे, कुलदिप घोळवे, पळसे यांचा समावेश होता.