जामखेड टाइम्स वृत्तसेवा : खर्डा शहरातील जैन श्वेतांबर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरातील मूर्तीवरील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्या–चांदीचे दागिने चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता मंदिर बंद केल्यानंतर ते २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. अज्ञात चोरट्याने जैन श्वेतांबर मंदिराचा लाकडी दरवाज्याचा कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला.मंदिरातील मूर्तीवरील सोन्याची मालपट्टी, चांदीच्या बारा टिकल्या, चांदीचा मुकुट, चांदीचा नारळ तसेच चांदीचा कंबरपट्टा असा एकूण सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी खर्डा येथील कांतीलाल मोतीलाल खिवंसरा (वय ६०) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १२/२०२६ भारतीय न्याय दंड संहिता कलम ३०५ (डी) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे, ठसे तज्ञांची मदत घेऊन श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले, चोरीचा कसून तपास खर्डा पोलिसांनी चालू केला परंतु अद्याप कुठलाही सुगावा लागला नसल्याचे समजते.
या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून मंदिर परिसरात सुरक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.