जामखेड : वसुलीचा ‘काळा खेळ’; मॅनेजरने लाटले पैसे आणि बळी गेला निष्पाप हॉटेल चालकाचा! सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा, अशोक जाधव प्रकरणात मुकुंद बोरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पिंपरखेड येथील अशोक जाधव आत्महत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. अदानी कॅपिटल फायनान्सच्या मॅनेजरने वसुलीचे पैसे हडपून, सातत्याने मानसिक त्रास दिल्यामुळे जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून उघड झाली आहे. पोलिसांनी मॅनेजर मुकुंद बोरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कर्ज वसुलीच्या नावाखाली चालणाऱ्या एका ‘काळ्या खेळा’ने एका निष्पाप हॉटेल चालकाचा बळी घेतला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

​black game of recovery adani finance manager case jamkhed ashok jadhav suicide case mukund borkar registered

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे ‘साईराज चायनीज सेंटर’ नावाचे हॉटेल चालवणारे अशोक जाधव यांनी २७ मार्च २०२६ रोजी आपल्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जाधव यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि डायरीतील मजकुरामुळे जाधव यांच्या आत्महत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

वसुलीचे पैसे आणि मॅनेजरचा ‘खेळ’

मयत अशोक जाधव यांच्या पत्नी सुषमा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक जाधव हे २०१६ ते २०२२ या काळात ‘अदानी कॅपिटल फायनान्स कंपनी’ (अहिल्यानगर) मध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि आष्टी या तालुक्यांची जबाबदारी होती.

जाधव यांनी शेतकऱ्यांकडून गोळा केलेली वसुलीची रक्कम कंपनीचे मॅनेजर मुकुंद बोरकर यांच्याकडे जमा केली होती. मात्र, बोरकर यांनी ही रक्कम कंपनीत पुढे भरलीच नाही. परिणामी, कंपनीच्या दप्तरी ही रक्कम जाधव यांच्या नावावर थकीत दिसू लागली. यामुळे कर्जदार शेतकरी पैशांच्या मागणीसाठी जाधव यांच्या घरी यायचे.

धमकावणी आणि मानसिक छळ

तक्रारीत नमूद केल्यानुसार, जाधव यांनी २०२२ मध्ये कंपनीचे काम सोडले होते. काम सोडताना त्यांनी २ लाख ८० हजार रुपये मॅनेजर बोरकर यांच्याकडे जमा केले होते. इतकेच नव्हे तर, बोरकर याने दबाव टाकल्यामुळे जाधव यांनी ग्राहकांचे १ लाख ८० हजार रुपये स्वतःच्या खिशातून भरले होते. तरीही मॅनेजर मुकुंद बोरकर हा समाधानी नव्हता.

तो जाधव यांना सतत पैशांची मागणी करून “पैसे भरले नाहीस तर तुझ्यावर केस करेन,” अशी धमकी देत होता. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे अशोक जाधव प्रचंड तणावाखाली होते. “मुकुंद बोरकरमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे,” असे ते वारंवार पत्नीला सांगत असत.

सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

अशोक जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी आणि डायरीच्या पानावर सविस्तर मजकूर लिहून ठेवला होता. या चिठ्ठीत मॅनेजर बोरकर याच्या त्रासाचा उल्लेख होता. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मुकुंद बोरकरवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.