जामखेडच्या कला केंद्रावर पुन्हा तुफान राडा, रेणूका कला केंद्राची तोडफोड, १७ जणांविरोधात गुन्हे दाखल, आरोपी सीसीटिव्हीत कैद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ‘चिंग्याच्या नादी लागू नका, नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’ असे म्हणत मोहा येथील कलाकेंद्रावर पुन्हा एकदा तुफान राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तोंडाला रूमाल बांधून आणि हातात तलवार, काठ्या, कोयते घेऊन आलेल्या १७ जणांच्या टोळक्याने गुरूवारी मध्यरात्री जामखेडच्या रेणूका कला केंद्रावर तुफान हल्ला चढवला. तब्बल २० मिनिटे हा राडा सुरू होता. या कला केंद्रावर अश्या प्रकारचा हल्ला होण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे.

गुरूवारी मध्यरात्री मोहा येथील रेणुका कलाकेंद्रावर तीन ते चार चारचाकी गाड्यांमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कलाकेंद्राच्या गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून रेणूका कलाकेंद्रात प्रवेश करत तेथे तुफान राडा घातला. तोंडाला रूमाल बांधून आणि हातात तलवार, काठ्या, कोयते घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी हा हल्ला घडवला. तोडफोड सुरू असताना कलाकेंद्रातील नृत्यागणांनी सदर घटनेची माहिती जामखेड पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. परंतू पोलिस येण्याआधीच हल्लेखोर चारचाकी वाहनातून बीडच्या दिशेने फरार झाले.
तीन दिवसांपूर्वी रेणुका कलाकेंद्रावर सराईत गुंडाच्या टोळीने धुडगूस घातला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा या कलाकेंद्रावर हल्ला झाला आहे. कोल्हाटी खूप माजलेत चिंग्याच्या नादी लागू नका, त्याचा परिणाम भोगावा लागेल असे म्हणत घाणघाण शिविगाळ केली व परिसरात दहशत निर्माण करत हल्लेखोरांनी मोठा धुडगूस घातला. त्यानंतर सर्व आरोपी सौताडा रस्त्याने बीडच्या दिशेने फरार झाले. रेणूका कला केंद्रावर हल्ला करणारे सर्व आरोपी सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. या सर्व आरोपींना तातडीने शोधण्याचे मोठे अव्हान जामखेड पोलिसांसमोर आहे.
ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ३२४(४), १८९ (२), १९१,(२),१९१(३) २५(४) भारतीय अधिनियम कलम (७) अन्वये १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र वाघ करत आहे.