जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भरदिवसा गावठी कट्टा हातात घेऊन गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास जामखेड पोलिसांनी अटक केली.चार दिवसांपुर्वी चोंडी (Chondi) गावात ही घटना घडली होती.अजित उबाळे (Ajit Ubale) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चोंडी घडलेल्या ‘त्या’ घटनेप्रकरणी अनेक ‘तर्कवितर्क’ लढवले जात होते. घटनेबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. परंतू आता पोलिसांच्या कारवाईनंतर यावर पडदा पडला.

३० ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र चोंडी येथील चोंडी ते चापडगाव जाणाऱ्या रोडवर अजित लालासाहेब उबाळे हा तरूण हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची बातमी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांचे एक पथक चोंडीत दाखल झाले होते.
पोलिस पथकाने सदर तरुणाचा शोध घेतला असता तो चोंडी ते चापडगाव जाणाऱ्या रोडवरील सिना नदीच्या पुलाजवळ पोलिसांना दिसला.त्याच्या हातात अग्णीशस्त्र हत्यार दिसुन आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता, तो नदीच्या किनारी असलेल्या काटेरी वनात पळुन गेला.तेव्हापासून तो फरार होता.पोलिसांनी शोधाशोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

या प्रकरणी २ सप्टेंबर रोजी पोलिस काँस्टेबल कुलदिप पांडुरंग घोळवे यांच्या फिर्यादीवरून अजित लालासाहेब उबाळे या तरूणाविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ चे कलम ७ सह महाराट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरूणाला पाटोदा येथून लगेच अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोलीस काँस्टेबल देविदास पळसे, पोलिस काँस्टेबल कुलदिप घोळवे, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलिस काँस्टेबल नितीन शिंदे यांनी केली.यावेळी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपीस ताब्यात घेतले आहे.