जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या तीन चार दिवसांपासून बालाघाटात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जामखेड तालुक्यातील भूतवडा व मोहरी हे दोन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. मात्र जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा खैरी मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. १९ ऑगस्ट अखेर खैरी धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. खैरी पाणलोटक्षेत्राला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

जामखेड तालुक्यात जूनच्या प्रारंभी दमदार पाऊस पडला. मात्र त्याने पुढे अनेक दिवस ओढ दिली.यामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडेठाक तर काहींमध्ये थोडेफार पाणी होते. तेव्हापासून जामखेड तालुका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. ऑगस्ट महिन्यात पावसाचे पुन्हा आगमन झाले. आता गेल्या तीन चार दिवसांपासून बालाघाटासह तालुक्यातील इतर भागात दमदार पाऊस पडलाय. यामुळे बालाघाटाच्या लाभक्षेत्रातील भूतवडा आणि मोहरी हे दोन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. इतर प्रकल्पात पाण्याची थोडी फार आवक झाली. मात्र हे तलाव अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जामखेड तालुक्यातील जलसाठ्यांची आजची स्थिती (१९ ऑगस्ट अखेर)
- भूतवडा दोन्ही तलाव – ओव्हर फ्लो
- मोहरी तलाव -ओव्हर फ्लो
- खैरी प्रकल्प – ६० टक्के,
- रत्नापूर तलाव – ८ टक्के,
- धोत्री तलाव – ५० टक्के,
- धोंडपारगाव तलाव – ३५ टक्के,
- नायगाव – ३० टक्के,
- तेलंगशी तलाव – २१ टक्के,
- पिंपळगाव आवळा तलाव – ३३ टक्के,
- जवळके तलाव – ४२ टक्के
भूतवडा तलाव ओव्हर फ्लो : जामखेड शहराला दिलासा
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव (जोड तलावासह) ओव्हर फ्लो झाला आहे. जुन्या भुतवडा तलावाची साठवण क्षमता ११९ दशलक्ष घनफूट आहे. तर जोडतलावाची साठवण क्षमता ५६ दशलक्ष घनफूट आहे. दोन्ही तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. विंचरणा नदीला पाणी वाढले आहे. याचा फायदा रत्नापुर तलाव भरण्यास होणार आहे. घाटमाथ्यावर दमदार पाऊस असाच कायम राहिला तर रत्नापुर तलाव (काझेवाडी) लवकर भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भूतवडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतकरी आणि शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहरी तलाव ओव्हर फ्लो
बालाघाट डोंगर रांगेच्या कुशीत वसलेल्या मोहरी येथील तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.गेल्या चार पाच दिवसांपासून डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. यामुळे तलावात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तलाव ओव्हर फ्लो झाला. तलाव ओसांडून वाहू लागल्याने शेतकरी वर्ग आनंदून गेला आहे.
