जामखेड : आंदोलनाचा इशारा देताच एसटी प्रशासन खडबडून जागे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या मागणीला मोठे यश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड – करमाळा राज्यमार्गावरील अनियमीत एसटी बस सेवेबाबत भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी रास्ता रोको अंदोलनाचा इशारा देताच एसटी प्रशासन खडबडून जागे झाले. अंदोलनापुर्वी एसटी प्रशासनाने प्रशांत शिंदे यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत शिंदे यांनी जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको अंदोलनाची हाक दिली होती. त्यांच्या पहिल्या अंदोलनापुर्वीच त्यांना मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे उद्या १८ रोजी जवळा येथे होणारे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली आहे.

ST administration woke up with bang as soon as protest was warned, demand of taluka president of  BJP Youth Morcha, Prashant Shinde, was big success, jawala, jamkhed latest news today,

जामखेड- करमाळा मार्गावरील बससेवेचा बोजवारा उडाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे शालेय विद्यार्थी आणि शेकडो प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत होते. या प्रश्नावर तोडगा निघावा आणि बससेवा सुरळीत व्हावी याकरिता एसटी प्रशासनाकडे अनेकदा विनंत्या करण्यात आल्या होत्या परंतू याची दखल घेतली जात नव्हती. अनियमीत एसटी बससेवेमुळे निर्माण झालेल्या ज्वलंत प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा या जनतेच्या मागणीची दखल घेत भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत जवळा येथे रास्ता रोको आंदोलन हाती घेण्याचा इशारा एसटी प्रशासनाला निवेदनाद्वारे ९ डिसेंबर रोजी दिला होता.

१८ डिसेंबर २०२५ रोजी जवळा येथे होणाऱ्या रास्ता रोको अंदोलनापुर्वी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या. खडबडून जाग आलेल्या एसटी प्रशासनाने जामखेड करमाळा मार्गावरील बससेवेबाबत भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, सरपंच सुशील आव्हाड व जवळा ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेत मागील दोन दिवसांपासून जामखेड करमाळा मार्गावर नवीन बसेस सुरू केल्या आहेत. जामखेड आगारातून रात्री साडे आठ वाजता जवळा गावासाठी मुक्कामी बस सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे चुंबळी, पाडळी फाटा, झिक्री, धोंडपारगाव, राजेवाडी, नान्नज आणि जवळा या भागातील शेकडो प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे

त्याचबरोबर पुर्वी सुरू असलेली जवळा – नगर बससेवा पुन्हा सुरू करावी ही मागणीही एसटी प्रशासनाने मान्य केली असून जवळा – नगर बससेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशी यांना मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हक्काची बस सुरू झाल्यामुळे जवळा, हळगाव, पिंपरखेड, अरणगाव या मोठ्या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच जवळा येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना जवळा बसस्थानकातून करमाळ्याला जाण्यासाठी दुपारी साडेचार ते साडेसात या वेळेत बस नव्हती. विद्यार्थ्यांना ताटकळत बसस्थानकावर बसावे लागायचे. बसस्थानकावर रोडरोमिओंचा विद्यार्थीनींना त्रास सहन करावा लागायचा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गंभीर प्रश्नाचीही एसटी प्रशासनाने दखल घेत तातडीने साडेचार वाजताची बस सेवा सुरू केली आहे.

तसेच जामखेड करमाळा मार्गावर धावणाऱ्या एसटी बससेवेच्या अनियमीत वेळापत्रकात बदल करण्याची कार्यवाही तातडीने पुर्ण करण्यात आली आहे. याशिवाय इतर मागण्यांवर लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे एसटी प्रशासनाने प्रशांत शिंदे व जवळा ग्रामपंचायतला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अनियमीत एसटी बस सेवेबाबतच्या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी जवळ्याचे सरपंच सुशील आव्हाड, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, युवा नेते राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुभाष रोडे, हरिदास हजारे, कांतीलाल महारनवर, अमोल हजारे, लखन हजारे, जीवन रोडे, अजित लेकुरवाळे विद्यार्थी, पालक, जवळा ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

अन्यथा पुन्हा तीव्र अंदोलन – प्रशांत शिंदे

एसटीचे जिल्हा विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, जामखेडचे आगारप्रमुख प्रमोद जगताप यांनी अनियमीत बससेवेबाबतच्या मागणीची तातडीने दखल घेत बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. तसे लेखी पत्र त्यांनी दिले आहे. त्यानुसार जामखेड करमाळा मार्गावरील बससेवा सुरळीत करण्यासाठी काही नवीन बसेस सुरू केल्या आहेत तसेच जुन्या बसेसचे वेळापत्रकात बदल केला आहे. यामुळे जवळा येथे १८ डिसेंबर रोजी होणारे रास्ता रोको अंदोलन तात्पुरते स्थितीत करण्यात आले. ऊर्वरीत मागण्यांची अंमलबजावणी येत्या महिनाभरात न झाल्यास आम्ही पुन्हा तीव्र अंदोलन करणार आहोत याची एसटी प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिला आहे.