जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड – करमाळा राज्यमार्गावरील एसटी बस सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे विद्यार्थी आणि प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरील बससेवा सुरळीत व्हावी, यासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे आक्रमक झाले आहेत. एसटी बस प्रवाश्यांच्या ज्वलंत प्रश्नावर जवळा येथे येत्या १८ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन हाती घेण्याचा इशारा प्रशांत शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड – करमाळा राज्यमार्गावर जामखेड आगाराच्या अपु-या बस फे-या असल्याने, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत गेली तीन वर्षापासून वारंवार सांगूनही, यामध्ये काहीही सूधारणा झालेली नाही. जामखेड – करमाळा राज्यमार्गावर ३-३ तास बस नसतात. मात्र बहुतांशवेळा ४-५ बस एकामागोमाग जातात. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करमाळ्याला जाण्यासाठी बस नसते. त्यानंतर पुढील एक तासात साधारण ४-५ बस एकामागोमाग येतात.
जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आळजापुर आणि बिटरगाव (ता.करमाळा ) येथील साधारण ५० हून अधिक विद्यार्थी बसने येत असतात. दुपारी सव्वाचार वाजता विद्यालय सुटल्यानंतर मात्र सायंकाळी साडेसात पर्यंत बस येत नसल्याने या विद्यार्थ्यांना तब्बल ३ -३ तास जवळा बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. यामध्ये या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातानाच, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वारंवार सांगुनही यामध्ये सुधारणा झालेली नाही. यासाठी दुपारी चार वाजता जामखेड बसस्थानकावरून करमाळयाला जाण्यासाठी बस सोडावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना जवळा येथुन साधारण साडेचार पर्यंत बस मिळेल.
गेली ५० वर्षाहूनही अधिक काळापासून चालु असलेली रात्री साडेआठ वाजताची जामखेड- जवळा मुक्कामी बस विनाकारण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री उशिरा जामखेडहून जवळा , नान्नज, बोर्ले, राजेवाडी, धोंडपारगाव, झिक्री, पाडळी, चुंभळी गावाकडे येणा-या प्रवाशांचे खूप हाल होत असून, जादा पैसे खर्च करून खाजगी वाहनाने आपल्या गावी यावे लागत आहे. सदरची जामखेड – जवळा मुक्कामी बस पुर्ववत चालु करावी.
जवळा – अहिल्यानगर बस कधी चालु तर कधी बंद असते.यामध्ये प्रवाशांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी सदरची बस नियमीत सूरू ठेवावी. यापुर्वी चालु असलेली जामखेड- जवळा – करमाळा मार्गे पुणे बस नियमीत सूरू करावी. त्याचबरोबर यामार्गे दिवसभरात दोन बस पुण्याला सोडण्यात याव्यात.
जामखेड – करमाळा मार्गावर पंढरपुरला जाण्यासाठी कोणत्याही आगाराची बस नसल्याने , पंढरपुरला जाणा-या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. यापुवी पाथर्डी आणि शेवगाव आगाराच्या दोन बस या मार्गावरून पंढरपुरला जात होत्या.मात्र सध्या या दोन्ही बंद आहेत. त्याचबरोबर जामखेड आगारामार्फत जामखेड- पंढरपुर बस सूरू होती.मात्र ही बस अनेक वर्षापासून बंद आहे. या तीन्ही आगाराच्या पंढरपुरला जाणा-या बस पुर्ववत सूरू करण्यात याव्यात.
जामखेड आगाराची चौंडी – इंदौर बस , प्रवाशांना सोईस्कर ठरण्यासाठी जामखेड- नान्नज- जवळा – हाळगाव- चौंडी – चापडगाव मार्गे अहिल्यानगर अशी सूरू करावी. जामखेड-करमाळा राज्यमार्गावरील लांबच्या पल्ल्याची एकमेव अकलूज डेपोची अकलूज – संभाजीनगर बस फाट्यावरून न नेता जवळा बसस्थानकावरून नियमीत नेण्यात यावी. यासंदर्भात अकलूज आगाराला सुचना देण्यात याव्यात, अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
वरील सर्व मागण्यांच्या अनुषंगाने येत्या गुरूवारी (१८ डिसेंबर रोजी) जवळा येथे रास्ता रोको आंदोलन हाती घेण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे व जवळा गावचे सरपंच सुशील आव्हाड यांनी दिला आहे. सदर अंदोलनाबाबतचे निवेदन विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्यासह एसटीचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, जामखेडचे आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना देण्यात आले आहे.