शेतीच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित माती परीक्षण गरजेचे : डॉ. दत्तात्रय सोनवणे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दरवर्षी मातीचे महत्व व गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात ०५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. शेतीमध्ये मृदेच्या आरोग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी आरोग्याची जशी तपासणी केली जाते, तशीच शेतीमध्ये मातीच्या आरोग्याचीदेखील तपासणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि हाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी केले.

२०२५ मध्ये प्रचंड पाऊस पडला. यामुळे राज्यातील अनेक भागात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. अतिवृष्टीमुळे होणारी मातीची धूप थांबवली पाहिजे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी विविध उत्पादने विकसित केली आहेत. ज्याद्वारे, पिकांचे अवशेष कुजवून अन्नद्रव्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात होते. शेतकरी बांधवांनी ही उत्पादने वापरावीत असा सल्ला त्यांनी यावेळी बोलतानक दिला.महाविद्यालयात माती परीक्षणास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे १२ व्या जागतिक मृदा दिनानिमित्त “निरोगी माती निरोगी शहरे” या संकल्पनेवर आधारित मातीचे शाश्वत व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्व व माती नमुना पद्धत प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. पोपट पवार, डॉ. मनोज गुड, डॉ. अनिकेत गायकवाड, संजय आढाव, पै. रावसाहेब ढवळे, शरद ढवळे उपस्थित होते. 

मृदाशास्त्र व कृषि रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिकेत गायकवाड यांनी माती परीक्षणाचे महत्व व माती नमुना पद्धत प्रात्यक्षिक सादर केले. सदर प्रात्यक्षिकातून त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा, नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी, माती परीक्षणाच्या अहवालाची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी व विद्यार्थी यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी श्रुती काळे व हर्षल काकडे यांनी आपल्या मनोगतातून जागतिक मृदा दिनाचे महत्व विषद केले. चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी सुबक रांगोळीद्वारे भारतातील मृदांचा नकाशा रेखाटून माहिती दिली. 

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रणाली ठाकरे यांनी सादर केले. सूत्रसंचालन अनुजा जाधव व नम्रता कदम यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. संदीप मोरे यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.