जामखेड : सलग दुसर्या दिवशी बिबट्याचे दर्शन, गीतेवाडी परिसरात भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याची जनतेची मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील डोंगराळ भागासह तालुक्यातील काही गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून गीतेवाडी या भागात बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागात सक्रीय असलेल्या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

खर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गीतेवाडी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गीतेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ होडशीळ व त्यांचे वडील तुकाराम होडशीळ हे रात्री ज्वारी व कांदा पिकाला पाणी देत होते. रात्री ९:४० वाजता वीज खंडित झाल्यावर बांधावर आवाज झाल्याने नवनाथ होडशीळ यांनी बॅटरीचा प्रकाश टाकला असता, समोर त्यांना बिबट्या दिसला. बॅटरीच्या प्रकाशामुळे बिबट्या जवळच्या झाडावर चढला.प्रसंगावधान राखत होडशीळ यांनी वडिलांना सावध केले.
त्यानंतर दोघे शेतातून गावाकडे सुरक्षितपणे गेले. शेतात बिबट्या असल्याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. लाठ्या-काठ्या घेऊन ग्रामस्थांनी बिबट्याचा परिसरात शोध घेत असता तो गांधणेश्वर वस्तीवरील शाळेजवळ आढळून आला. ग्रामस्थांनी जोरदार आवाज केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
बालाघाटच्या डोंगररांगेत खर्डा परिसरातील अनेक गावे येतात, याच गावांमध्ये बिबट्याचे सातत्याने दर्शन घडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून गीतेवाडीत बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात वनविभागाने त्वरीत पिंजरा लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे. वनविभागाकडून यापुर्वी मोहरी येथे दोन तर नागोबाची वाडी येथे एक असे तीन पिंजरे लावण्यात आलेले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांत जवळा, चोंडी या भागातही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या भागातही भीतीचे वातावरण आहे. जामखेड तालुक्यात सक्रीय असलेल्या सर्व बिबट्यांचा वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.