जामखेड : फक्राबाद येथे कागदी लिंबू उत्पादन तंत्रज्ञान व पिक संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ‘ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2025’ अंतर्गत हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषिकन्यांच्या पुढाकारातून फक्राबाद येथे कागदी लिंबू उत्पादन तंत्रज्ञान व पिक संरक्षण या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन फक्राबाद, वंजारवाडी आणि चोंडी गावच्या कृषिकन्यांनी केले होते.

यावेळी उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. पोपट पवार यांनी शेतकऱ्यांना कागदी लिंबूच्या सुधारित वाणांची माहिती, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, सिंचन तंत्रज्ञान, छाटणी तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज गुड यांनी लिंबूवरील करपा, पानगळ, खैरा, डाळिंबावरील तेल्या रोग व इतर बुरशीजन्य रोगांचे निदान व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले.

यानंतर लिंबू पिकांवर येणाऱ्या पानकीडा फळमाशी, शेंडेकीड तसेच डाळिंबावरील फुलकीड व फळकीड यांची लक्षणे, नुकसान व नियंत्रण याविषयी कृषि कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. धनेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले. विशेषतः एकात्मिक पिक संरक्षण व कमी खर्चिक तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला.

शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील समस्यांबाबत प्रश्न विचारले व तज्ञांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली. शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणामुळे कागदी लिंबू उत्पादन व पिक संरक्षणाबाबतचे ज्ञान वाढवले असून उत्पन्न वाढीस नक्कीच मदत होईल असे मत व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गास परिसरातील ७० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्कर्षा गवारे व कृषि विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. प्रणाली ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विश्वनाथ राऊत हे होते. यावेळी पोलिस पाटील योगेश जायभाय हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिकन्या प्रणाली अडसूळ व सानिया देशमुख यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन वंजारवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण जायभाय यांनी केले.