जामखेड : हळगावच्या शासकीय कृषि महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेची स्थापना, सभापतीपदी भूषण बाबर याची निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. सभापतीपदी तृतीय वर्षाचा विद्यार्थी भूषण बाबर याची निवड करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थी परिषदेच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या विविध समित्यांच्या निमंत्रक व सभासदांच्याही निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि महाविद्यालयाच्या कारभारात सहभागी होऊन सुधारणा घडवून आणण्यासाठी विद्यार्थी परिषदेची भूमिका निर्णायक ठरते. विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना, आवडीनिवडी व समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी परिषद हे एक प्रभावी माध्यम आहे.

यामार्फत, विद्यार्थ्यांना विविध क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन, लोकशाही पद्धतीने नेतृत्व आणि व्यवस्थापनाचा अनुभव, सामाजिक जबाबदारीची जाणीव, सकारात्मक आणि सहकारी वातावरण वाढीस लागण्याचे महत्वाचे कार्य घडवून आणता येते, व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यार्थी परिषदेची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. प्रेरणा भोसले, मुख्य समुपदेशक डॉ. गोकुळ वामन, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, नोडल अधिकारी प्लेसमेंट सेल डॉ. मनोज गुड उपस्थित होते. डॉ. सोनवणे यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेचे सभापती तसेच विविध समित्यांचे निमंत्रक व सभासदांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींची निवड लोकशाही पद्धतीने व गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली. त्यानुसार तृतीय वर्षातील विद्यार्थी भुषण बाळासाहेब बाबर याची विद्यार्थी परिषदेच्या सभापती पदी निवड करण्यात आली. तसेच, विद्यार्थी परिषदेच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या विविध समित्यांच्या निमंत्रक व सभासदांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि महाविद्यालयाच्या कारभारात सहभागी होऊन सकारात्मक कार्य करण्याचे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांनी दिले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रीय सहभागातून विद्यार्थी परिषदेचा स्थापना समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.