जामखेड : महात्मा फुले चौक विटंबना प्रकरणी जवळा गावात कडकडीत बंद, दोषींवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन येथील महात्मा फुले चौकातील फलकाची विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील जवळा गावात बुधवारी (६ ऑगस्ट २०२५) कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. ग्रामस्थांनी शांततेत बंद पाळत राशीन घटनेप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे काही समाजकंटकांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने असलेल्या चौकाची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद जिल्हात उमटत आहेत. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील जवळा गावात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. राशीन घटना प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कर्जत तालुक्यातील राशीन गावात २०१४ साली ग्रामपंचायतचा ठराव घेवून राशिन चौकात महात्मा फुले यांचा नामफलक लावला होता. मात्र, काही समाजकंटकांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी या फलकाची तोडफोड करत विटंबना केली. या प्रकारामुळे महात्मा फुले यांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि बहुजन समाजाच्या उत्थानाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांच्याशी संबंधित स्थळाची विटंबना ही संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानावर आघात करणारी घटना आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामस्थांनी बुधवारी जवळा बंद अंदोलन करत राशीनच्या घटनेचा निषेध नोंदवला. बंदच्या काळात गावातील बाजारपेठ, दुकाने, खासगी आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. ग्रामस्थांनी बंद शांततेत आणि संयमाने पाळला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. त्यांच्या स्मृतीचा अवमान होणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या अस्मितेवर आघात आहे. अशा प्रकारची कधीही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या घटनेबाबत संबंधित दोषींना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.
