जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीवर लवकरच प्रशासकराज लागणार आहे. येत्या काही दिवसांत ४९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हळगाव, फक्राबाद व धनेगाव या तीन ग्रामपंचायतींवर प्रशासक आहे. त्यात आता ४७ ग्रामपंचायतींची भर पडणार आहे. ५८ पैकी ५२ ग्रामपंचायतीवर प्रशासकराज येणार असल्याने गावपुढारी गॅसवर गेले आहेत.

जामखेड तालुक्यासह राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासकराज येणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश जारी केले आहेत. यामुळे गावगाड्याच्या राजकारणात सध्या मोठी अस्वस्थता आहे. गावकारभारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गावपुढाऱ्यांना दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
आरक्षणाच्या वादामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. कोर्टाच्या निकालानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडतील. त्यानंतर थेट दिवाळीत किंवा दिवाळीनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर होतील.
जामखेड तालुक्यातील नान्नज, चोंडी, खर्डा, जवळके, घोडेगाव, अरणगाव, पिंपरखेड, कुसडगाव, पाटोदा, डोणगाव, बोर्ले, चोभेवाडी, गुरेवाडी, बावी, बांधखडक, धानोरा, आघी, खांडवी, खुरदैठण, धोंडपारगाव, पाडळी, झिक्री, वाघा, राजेवाडी, पोतेवाडी, तरडगाव, सोनेगाव, सावरगाव, तेलंगशी, सारोळा, सातेफळ, पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा, नायगाव, धामणगाव, नाहुली, मोहरी, मोहा, लोणी, जायभायवाडी, कवडगाव, दिघोळ, देवदैठण, जातेगाव, आनंदवाडी, बाळगव्हाण, आपटी येथील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ चालू महिन्यात संपत असून काहींचा मार्चमध्ये संपणार आहे.