जामखेड : विविध मागण्यांसाठी पिंपळगाव आळवा येथे आमरण उपोषणा सुरु, युवा सामाजिक कार्यकर्ते राजु बारवकर यांचा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते राजु अमृतराव बारवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज, २३ ऑक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी पिंपळगाव आळवा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे.

पिंपळगाव आळवा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते राजु बारवकर यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये — विशेष ग्रामसभेच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, २८ ऑगस्टच्या ग्रामसभेच्या व्हिडिओवरून रोजगार सहाय्यकाची निवड करणे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता योजनेतील भ्रष्टाचारावर कारवाई, तसेच पायाभूत सुविधांच्या निधीचा हिशोब सार्वजनिक करणे — या मागण्यांचा समावेश आहे.
बारवकर यांचा आरोप आहे की, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून नियमबाह्य कामे केली असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी प्रशासनाकडून अंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, परंतू तो अयशस्वी ठरला. अंदोलक उपोषणावर ठाम असून त्यांचे अंदोलन सुरूच आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते राजु बारवकर यांच्यासह केशव बारवकर, श्रीकांत पवार, बोराटे सर, दिनेश बारवकर, विशाल बारवकर, कर्णा बारवकर, शशिकांत बोबडे, संदीप नरके, विनोद बारवकर, टिल्लू भाई शेख, कृष्णा बारवकर हे अंदोलनात सहभागी झाले आहेत.अंदोलकांच्या मागणीनुसार प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपुर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.