जामखेड : कुटुंबाचा आधार… संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या ज्येष्ठांचा अनोखा सन्मान, हळगावच्या जय भवानी मंडळाचा आदर्श उपक्रम

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कुटुंबाचा आधार…संस्कृतीचा वारस आणि अनुभवाची अमूल्य शिदोरी जपणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करणारा एक भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा जामखेड तालुक्यातील हळगाव येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.जय भवानी युवा कला-क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून या गुणगौरव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी सामाजिक सलोखा, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शिवजयंतीसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या जय भवानी युवा कला व क्रिडा मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब ढवळे, सचिव लतिफभाई शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वतीने गावासह पंचक्रोशीतील ८० ते १०० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ महिला-पुरुषांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव संभाजी ढवळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेडचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, प्राचार्य श्रीकांत होशिंग, सामाजिक कार्यकर्ते फकीर मौलाना, दादा झिंझाडे सर सह आदी उपस्थित होते.

यावेळी पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्यात पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी व इतर पाहुण्यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्यामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद… चैतन्य…आणि समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.

ज्येष्ठ नागरिक म्हणजे घरातील चालते-बोलते विद्यापीठ… कुटुंबाचा मजबूत पाया…त्यांचा आदर म्हणजे संस्कृतीचा खरा सन्मान होय, “खेड्यात आजही ज्येष्ठांचा सन्मान जपला जातो, मात्र शहरी भागातील चित्र बदलण्याची गरज आहे,”असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच जय भवानी मंडळाने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनीच भरभरून कौतूक केले.


पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले, की ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती असून ते महत्प्रयासाने कुटुंब उभे करतात. त्यामुळे त्यांनी भरपूर कष्ट व मेहनत घेतली आहे. मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. आज त्यांच्या पाठीशी अनुभवाची समृध्द शिदोरी आहे

दादा झिंझाडे सर म्हणाले की, खेड्यात व शेतकरी कुटुंबात ज्येष्ठांचा योग्य आदर व मानसन्मान जपला जात आहे. ग्रामीण ज्येष्ठ मंडळी कोणत्याही वृध्दाश्रमात दिसत नाहीत, पण शहरी भागातील चित्र वेगळे आहे, ते बदलायला हवे. सेवानिवृत्त प्राचार्य श्रीकांत होशिंग हे संस्कृत श्लोक व कवितांमधून व्यक्त झाले.

ज्येष्ठ नागरिक ही वटवृक्षाची गर्द सावली आहे. कुटुंबाला सकारात्मक व योग्य दिशा देण्याची महत्वाची भूमिका ते करतात. मंदिरात देव शोधण्यापेक्षा घरातील चालते बोलते दैवत आई-वडील आहेत. त्यांचा आदर-सन्मान हीच देवपूजा आहे. परिवारात व समाजात त्यांची अवहेलना होऊ नये, अशी भावना यावेळी निकम महाराज यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठांना अडगळीत टाकण्याच्या काळात समाजाला संस्कार आणि माणुसकीची आठवण जयभवानी मंडळाने करून देत  ज्येष्ठांचा अनादर करणाऱ्या प्रवृत्तीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आणि ज्येष्ठांचा आदर मान सन्मान करणारा समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होतो हाच प्रेरणादायी संदेश हळगावच्या जय भवानी मंडळाने आपल्या अनोख्या उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी दिला आहे, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते फकीर मौलाना यांनी व्यक्त केली.

यावेळी पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, निवृत्त मंडल कृषि अधिकारी सुंदरदास बिरंगळ, भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख सर, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मंडलिक, निवेदक निकम महाराज, अंकुश ढवळे सर, रविंद्र ढवळे, नवनाथ ढवळे, नानासाहेब ढवळे (वकील) उत्तम कापसे, किसन आबा ढवळे, राजाराम ढवळे, कृष्णा ढवळे, सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.