जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन येथे अज्ञात समाजकंटकांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकाची विटंबना केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद जामखेड तालुक्यात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी (६ रोजी ) जवळा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जामखेड तहसील कार्यालयात देण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे काही समाजकंटकांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने असलेल्या चौकातील फलकाची तोडफोड करत विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ०२ ऑगस्ट रोजी घडली असून या कृत्यामुळे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या असून, विविध भागांतून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील जवळा गावात ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत उद्या ६ ऑगस्ट २०२५ रोजी जवळा बंदची हाक दिली आहे.
या घटनेमुळे आक्रमक झालेल्या जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामस्थांनी जामखेड तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, “महात्मा फुले हे समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर लढले. त्यांच्या स्मारकाची वा नावाने असलेल्या चौकाची विटंबना ही समाजाच्या आत्मसन्मानावर आघात करणारी घटना आहे. त्यामुळे या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहोत. राशीन घटनाप्रकरणातील दोषी समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी जवळा गाव बंदचे अंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर महेश निमोणकर, संतोष गव्हाणे, सोमनाथ राऊत, संतोष मोहळकर, नितिन कोल्हे, विकास मासाळ, दिगांबर जगताप, किरण हजारे, अक्षय हजारे, शुभम हजारे, वैभव हजारे, अक्षय म्हेत्रे, दिगांबर म्हेत्रे, श्याम म्हेत्रे सह आदींच्या सह्या आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
- राशीन येथे २ ऑगस्ट रोजी महात्मा फुले चौकाची समाजकंटकांकडून विटंबना
- जामखेड तालुक्यात तीव्र संताप
- जवळा गाव बंदची घोषणा (६ ऑगस्ट, बुधवार)
- ५ ऑगस्ट रोजी जामखेड तहसीलदार यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी