जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील चार रस्त्यांसाठी तब्बल २० कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रा. राम शिंदेंनी कर्जत-जामखेडच्या जनतेला मोठे गिफ्ट’ दिले आहे. जनतेच्या मूलभूत गरजा ओळखून थेट कृतीतून विकास साधण्याची प्रा. राम शिंदे यांची कार्यशैली या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील दळणवळणाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम व दर्जेदार करण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील असतात. सरकार दरबारी राजकीय वजन वापरून त्यांनी आजवर कोट्यावधींचा निधी मंजूर करून आणला आहे. यातून अनेक महत्वाच्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत.
मतदारसंघातील काही महत्वाच्या मार्गांची झालेली दुरवस्था, नागरिकांना खड्ड्यांमुळे होणारा नाहक त्रास आणि वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन प्रा. राम शिंदे यांनी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा करत चार प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी २० कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीमुळे कर्जत-जामखेडमधील प्रमुख मार्गांचे रुंदीकरण, डांबरीकरण, दुरुस्ती आणि खड्डेमुक्तीची कामे मार्गी लागणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
कोणत्या रस्त्याला किती निधी?
जामखेड – खर्डा – भूम रस्ता : ₹१० कोटी
या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सर्वाधिक १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्याला जोडणाऱ्या या पट्ट्यातील वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे.
राहाता – लोहारे – मांडवा – पारनेर – बेलवंडी – श्रीगोंदा – हिरडगाव – कुळधरण – कर्जत – करमाळा रस्ता : ₹६ कोटी ८० लाख
अनेक तालुक्यांना आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या विस्तीर्ण मार्गाच्या सुधारणेसाठी पावणेसात कोटींचा निधी मिळाला असून, यामुळे आंतरतालुका संपर्क अधिक गतिमान होईल.
अमरापूर – पाथर्डी – माणिकदौंडी – कडा – मिरजगाव – कर्जत – राशिन – बारामती रस्ता (डिकसळ ते चिंचोली फाटा) : ₹२ कोटी
डिकसळ ते चिंचोली फाटा या टप्प्यातील रस्त्याच्या डांबरीकरण व सुधारणेसाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असून, या परिसरातील वाहतुकीची मोठी डोकेदुखी कायमस्वरूपी दूर होणार आहे.
घोगरगाव – कोंभळी – वालवड – कर्जत रस्ता : ₹१ कोटी २० लाख
स्थानिक ग्रामीण दळणवळणासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या मार्गावरील दुरुस्ती, डांबरीकरण आणि खड्डेमुक्तीसाठी सव्वा कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.